सेवागिरी महाराजांच्या मंदिराच्या गेटमधून आत पाय पडल्याबरोबर मला दत्ताच्या फोटोची फ्रेम दिसली . मी म्हटलं मनातच ' अच्छा , मला भेटायला बोलावलंय तर … ! ' दत्त मला आवडतो ! त्याच्या पुढे मागे चिकटलेल्या सार्या पुराणकथा आणि आख्यायिकांचे संदर्भ माझ्यासाठी महत्वाचे नसतात . मंदिर भव्य होते . आत जाऊन मंदिराच्या कुठल्या भागात झोपण्यासाठी जागा मिळते का ते पाहत होतो . पण अशी कुठेच जागा नव्हती . जी जागा होती तिथे आधीच काही लोकांनी बिछाना घातला होता . मंदिराच्या दुसर्या बाजूच्या रिकाम्या व्हरांड्यात खूप धूळ असल्या कारणाने मी तिथे झोपण्याचा विचार टाळला . मंदिराला कुलुपबंद खोल्या तर खूप दिसत होत्या . मनात आले कि इथे एखादी खोली मिळाली असती तर … ! पण हा विचारच चुकीचा होता ; मी माझ्या व्यक्तिगत कामानिमित्त इथे आलो होतो . माझ्या सामाजिक कार्यकर्ता असण्याचे एवढे ओझ्हे इथे कशासाठी ! पाऊलो काईलोचे ' द अल्केमिस्ट ' वाचल्यानंतर मला खूप छान आणि हलके वाटू लागले आहे . माझ्यात असणारा किडा मला ' सान्तियागो 'त मला दिसला ! सान्तियागोनं 'स्वप्ना'च्या पाठलागासाठी जे काही केलं तेव्हढं सध्या जरी मला करता येत नसलं तरी आपण अधून मधून अल्प स्वरूपात असं करत असतो ! पण यावेळी अगदी ठळकपणे सान्तियागो माझ्यात दाटला होता . व्यस्त दिनक्रमात खूप पाठपुरावे टाळले होते . पण यावेळी बेभानपणे पाठपुरावा करायचाच आपल्या स्वप्नांचा असं ठरवून मी माझ्या खोलीला कुलूप लावले !
कार्यक्रमाहून येताना सातारा रेल्वे स्थानकावर माझे दोन्ही फोन चोरीला गेल्यानं मी खूप अस्वस्थ होतो . तीनेक दिवसांनंतर मला असे वाटू लागले कि ' ठीक आहे न यार ; होत्या खूप आठवणी त्यात , मग आता चिंता , शोक करत बसण्याने त्या परत थोड्याच येणार आहेत ! मग मी चौथ्या दिवशी पुन्हा ताजा झालो . म्हटलं विडीओ , गाणी , प्रवचने , फोटो सगळे डोक्यात आहेत . ( फक्त सायरा आणि काही मनोरुग्णांचे विडीओ हरवल्याचे दुखः अजूनही सलत राहते कधी कधी !) पुन्हा मनाची अशी समजूत घातली कि , इतिहासात असे खुपसे दस्तऐवज नोंद व्हायच्या आधीच गडप झालेत , मग आपणच इतका शोक करत कशाला बसायचं ! त्यानंतर मी माझ्या वर्तमानात पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने समरस झालो . फोन नसल्याचे जसे फायदे जाणवले तसे थोडेफार तोटेही जाणवले ! प्रत्येक विषयाला त्याच्या पूरक काळजीची किनार असतेच ! … … याच्यापल्याड आनंदातिरेकाने , उन्मुक्तपणे जाऊन इतिहास कोरलेल्या माणसांना आपला सलाम !
दि . ०५ / ०२ / २०१६ रोजी मला पडलेल्या स्वप्नात ' पुसेगाव ' नावाच्या गावात माझा फोन असल्याचं मला दिसलं होतं . स्वप्न असं होतं - एका गावात दोन वेण्या घातलेली मुलगी एस . टी . तून उतरते आणि त्याच गावात मीही उतरतो . त्या गावाचे नाव ' पुसेगाव ' असे होते . त्या मुलीनं मला एका खड्ड्याच्या बाजूला पडलेला माझा फोन मनाला उचलून दिला . मी माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या मामाला म्हटलं कि , फोनची ब्याटरी संपली आहे चार्जिंग करतो . आणि मी तो फोन बाजूलाच असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चार्जिंगला लावला . आजही माझ्या डोळ्यांसमोर ते स्वप्न जसंच्या तसं आहे . मी या स्वप्नाला एका सूत्रात जोडलं ….पुसेगाव - शाळा -मुलगी - मोबाईल दुकान …. या सर्व कड्या जोडून मी हा शोध घ्यायचं ठरवलं . पुसेगावाचं नाव मी यापूर्वीच्या आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं . जायचं कसं वगैरे बाकीची माहिती मी इन्टरनेटवरून जमा केली . आणि काही तर्क करून , फोनचा शोध घ्यायचा ठरवून मी निघालो . माझा प्रवास सुरु झाला माझ्या स्वप्नाच्या दिशेने
आजरा - कोल्हापूर आणि तिथून पुणे असा प्रवास झाला . प्रवासात मागे पडणाऱ्या गावांना मी दरवेळी कुतूहलाने पहात असतो . याहीवेळी पाहिले ! छत्तिसगढनंतर जोधपुर आणि त्यानंतर मध्य प्रदेशातल्या अमरकंटक व विदर्भ - मराठवाडा भागातली गावे आणि त्या गावांतली घरे माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय होती . कुठल्याही गावातले पडके घर माझ्यासाठी खूपच कुतूहलाचा विषय असते . अशा घराचं कोसळलेपण पहात पुढे जाताना त्या घरातल्या पूर्वीच्या रहदारी आणि माणसांबद्दल मी विचार करत पुढे जात असतो . इथे पूर्वी रहात असलेल्या माणसांबद्दल आपसूक मनात विचार येतात . घाटीव दगड , रद्द्याच्या भिंती , भल्यामोठ्ठ्या तुळया , नक्षीदार खापऱ्या , आणि कोरीवकाम केलेल्या चौकटी आणि दारे , दगडी किंवा मातीचे ओटे आणि आठवणीत राहतील अशी सुबक अंगणे . या आणि असल्या इतर कित्येक घरांच्या ठळक आठवणीत राहतील अशा खुणा मनावर उमटत असतात . या प्रत्येक भागातल्या घरांच्या रचना दरवेळी नाविन्य घेऊन धारण करणाऱ्या ! मग माणसांच्या कित्येक नाना त-हा ! हरेक वळणागणिक एक नवीन परंपरा आणि रिती ! मात्र ह्या प्रवासात अधिकचं नवीन काहीतरी असेल असं जाणवत होतं !
पुण्यात पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती . युवराज पोवार ह्या मित्राच्या संदर्भाने ओळख झालेले ब्रिजमोहन पाटील यांना भेटायचं होतं . दै . सामना चे ते पत्रकार आहेत . भेट झाली . खास लातुरी उच्चारांच्या वळणाने त्यांनी पाहुणचार केला . त्यानंतर त्यांच्या ओळखीतल्या पोलिस उपायुक्तांना भेटण्यासाठी ते मला त्यांच्या गाडीवरून घेऊन गेले . पुण्याच्या रस्त्यांवरून गाडी जात असतानाहि मी गल्ल्या पहात आणि घरांची ठेवण यांबद्दल ब्रिजमोहन पाटलांशी चर्चा करत जात होतो . अपेक्षेप्रमाणे साहेबांची भेट झाली . त्यांनी जातीनिशी माझ्या मोबाईल हरवल्याबद्दलची तक्रार पुढे पाठवली . तिथल्या प्रत्येक पोलिसांशी ब्रिजमोहन पाटलांची ओळख होती आणि त्यामुळे माझ्या मोबईल मिळण्याच्या आशेची उंची माझ्या मनात उंचावत होती ! पत्रकार साहेब आणि भेटणाऱ्या प्रत्येक माणसांकडून येणाऱ्या अनुभवांनी माझ्या पुण्यातल्या यापूर्वीच्या दोन अनुभवांच्या ताठरतेला सैलपणा आला होता . पुण्यासारख्या शहरात जिथे ४ मिनिटे ( फुकटची ) कुणाला देण्यासाठी वेळ नसतो त्या ठिकाणी तब्बल ४ तास माझ्यासाठी पाटील साहेबांनी दिले . मी त्यांचे आभार कसे माणू हेच मला कळत नव्हते . शेवटी मी त्यांना म्हटले ' मी तुमचे आभार मानून मोकळा होऊ इच्छित नाही ! ' त्यांनी यावर दिलेलं उत्तर खूपच आधारदायी होतं . ते म्हणाले , ' आभार कसले मानायचे , माझ्याच्यानं जितकं होतंय तितकं मी केलं , बस्स ! ' पुन्हा स्वारगेट बस स्थानकावर मला सोडून ते आपल्या खोळंबलेल्या बातम्यांसाठी / कामासाठी निघून गेले . हा खूपच मनमोकळा आणि सच्चा माणूस भेटला मला !
मी शहाजी मुळे ह्या मित्राला फोन करून मी पुण्यात असल्याचे सांगितले होतेच . त्याला पुन्हा फोन करून मला भेटायला बोलावले . तो येईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो . संजय सोनवणी सरांना फोन करून ते इथे कुठे आसपास रहात असतील का याची विचारणा केली. ते १ तास अंतरावर सासवडला राहतात असे कळले . त्यांच्याशी संवाद झाला . भेटणं शक्य नव्हतं कारण अंतर जवळ नव्हतं आणि रात्रीचे साधारण ८ - ९ वाजले असावेत ! तोपर्यंत तिथे एक महिला आली आणि मला म्हणली कि , ' मी पुण्यात कामावर असणार्या माझ्या मुलांना भेटण्यासाठी बीडवरून आली हे ; पण त्यांचा फोन नंबर हरवलाय आणि मला खूप भूक लागले , मला काहीतरी खायाला पैसे द्या . ' मी तिला म्हटले कि , ' मी पैसे देणार नाही , तेव्हढे पैसे नाहीत माझ्याकडे , पण खायला घेऊन देईन '. यापूर्वी पुरस्कार सोहळ्याहून येताना याच बस स्थानकावर मला एका रुबाबदार माणसाने त्याचे पाकीट मारले आहे असे सांगून २०० रुपयांना फसवले होते . पण त्या अनुभवाला इथे आठवून शहाणं होऊन खायला न देणं मला काही योग्य वाटलं नाही . माणुसकीवरचा आपला विश्वास अभंग आहे ! मी ३० रुपयांची पावशेर सफरचंद घेऊन दिली . कारण माझ्याजवळ कटाकटीच पैसे होते . ( नरेंद्र पाटील ह्या मित्रांनी दिलेली उसनवार ! )माझ्या ह्या कृतीबद्दल मला काडीएवढाही पश्चाताप झाला नाही ! तिथून मग मुंबईची गाडी पकडून देण्यासाठी शहाजी आणि त्याचा मित्र आला होताच . सकाळी ४ . ०० वाजेपर्यंतचा प्रवास करून मुंबईत उतरलो . फोन करून नामदेव जाधव ह्या मित्राची झोप मोडली आणि मी त्याच्या खोलीवर विश्रांतीला गेलो !
नामदेव सकाळी उठून ऑफिसला गेला . त्याने मला आदल्या दिवशी ' सोबत असायला हवे का ' असे विचारले होते . पण मी नको म्हटले ! कुठे चुकायला होतंय ते होऊद्या ! जाताना माझ्यासाठी त्याने चपाती आणि भाजी ठेवून दिली . त्याने पवईला कसं जायचं ते मला सांगितलं . ४६१ नंबरची बस मला पकडायची होती . मी पकडली . बसलो . गाडीत ए . सी . होता हे आतल्या वातावरणावरून मला कळले . पण यासाठी वेगळे पैसे चार्ज केले जातात हे मला माहित नसल्यामुळे कंडक्टरने १०० मागितले. मी दिले . गाडीतून उतरल्यावर नामदेवाला फोन करून विचारल्यावर तो म्हणाला कि , 'ए सी . च्या गाडीत बसल्यामुळे तुझ्याकडून इतके पैसे घेतले ! कानाला खडा लावला ; मोठाल्या काचा असलेल्या गाडीत पुन्हा बसणे नाही ; त्या गाड्या अतिशय महाग असतात !
निलेशभाऊची भेट !
हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये निलेशदादाची भेट घेऊन त्याच्या ओळखीने हरवलेल्या मोबाईलसंदर्भात काही करता येऊ शकते का ते पाहण्यासाठी मी त्याला भेटलो . तो खूपच व्यस्त होता . त्याचे काम होईपर्यंत त्याच्याजवळ बसून राहिलो . त्याच्या मिळालेल्या वेळेत त्याने काही फोन केले आणि माझा विषय संबंधितांच्या कानावर घातला . सकारात्मक प्रतिसाद आला . या काळात मी जेव्हा बसून होतो तेव्हा समृद्धा कुलकर्णी आणि निलेश कांबळे ज्या तन्मयतेने येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटचे समुपदेशन करत होते ते पाहून मला त्या दोघांबद्दलचा आदर दुणावला . जराही न थकता , न कंटाळता , चेहऱ्यावरचे हसू जराही खळू न देता हे दोघे ऑफिसमध्ये येणाऱ्या किडनी किंवा इतर आजाराच्या पेशंटचे समाधान आपल्या उत्तरांनी करत होते . किडनी ट्रान्सप्लांट च्या रुग्णाच्या नातेवाईक आणि रुग्ण या दोहोंच्या चेहऱ्यावरील काळजीच्या खुणा पूर्ण ऑफिसभर दाटत असतात . अशा परीस्थित स्वतःचे मानसिक संतुलन जराही बिघडू न देता आपली भूमिका पार पडली जात होती . तिथं बसल्या बसल्या मी खूप गोष्टी शिकलो या दोघांकडून . एका पेशंटचे समुपदेशन चालू असताना दुसर्या पेशंटचे नातेवाईक तिथे येवून 'लीगल ' पेपरवर 'मेल 'वरची कागदपत्रे मागतात तेव्हा समृद्धा म्हणते कि , 'ऑफिसमध्ये लीगल वापरत नाही … पण दोन मिनिटे थांबा एखादा सापडला तर बघू आपण , शोधु आपण ! ' हा संवाद इतक्या आत्मियतेने झाला होता कि मी सुद्धा अचंबित झालो . कारण सरकारी दवाखाने किंवा इतर ठिकाणी मिळणारी वागणूक आणि हा प्रतिसाद याची मी तुलना करू लागलो होतो ! मी तिथं बसून येन-जाणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचे निरीक्षण करत होतो . निलेश दादाला भेटायला गेलं कि सर्व प्रकारचे पेशंट खूप लांबून - कसे आपल्या बिकट परिस्थितीतून इथवर आलेले असतात ते कळते ,त्यांना जवळून ऐकता येते . त्यांचा आजार आणि त्यांचे नाडलेपण खूपच अस्वस्थ करते . सरकारी कार्यालये , नेते / पदाधिकारी यांच्या कडून मिळालेल्या कडू - गोड अनुभवाचे घोट रिचवत ते इथवर उपचार मिळवण्यासाठी आलेले असतात . हृदयरोग , किडनी ट्रान्सप्लांट , पोटाचे किंवा इतर कॅन्सरचे रुग्ण इथे उपचारांसाठी आलेले असतात . काही सेवाभावी संस्था अशा रुग्णांना आर्थिक मदत करतात . हि मदत आणि अवयवदानाचे कार्यक्रम किंवा अवयव बदलासंदर्भात महत्वाचा दुवा म्हणून निलेश दादा काम करतात . त्यांच्या बद्दल मी खूप ऐकून होतोच पण मी लिहिले नव्हते . ( कारण मी लिहिले तर त्याला आवडणार नाही असे मला वाटले ) . त्यांच्या कामाबद्दल तिथं आलेल्या एका रुग्णाने दिलेली प्रतिक्रिया अशी होती , ' देव आणि आई नंतर जर कोणी देव असेल तर निलेश साहेब ! त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही . ' दुसरा एक सामाजिक कार्यकर्ता तिथं आला होता तो म्हणाला कि , 'निलेश साहेब आणि समृद्धा मॅडम जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत आम्हांला काहीच तक्रार नाही . मला खूप भारावल्यासारखे झाले .
ह्या दोन माणसांकडून मी खूप गोष्टी शिकलो तिथं बसून ! अशा माणसांच्या माध्यमातूनच आपलं आयुष्य सर्जनशील अंगाने समृद्ध होत असते . अशा माणसांबद्दल जितकं लिहावं तितकं थोडंच आहे . मुंबईहून येताना गाडीत बसवायला निलेश दादा आला होता . गाडीत बसवण्याअगोदर माझ्या गाडीच्या थकलेल्या कर्जासाठी त्याने ५००० रुपये दिले . तो असं दरवेळी मला पैसे देतो म्हणून गाडी आहे . मी त्याला माझ्या पुसेगावच्या स्वप्नासंदर्भात सांगितले आणि त्याचं माझ्या वेडेपणाबद्दलचं मत विचारलं ; '' बिनधास्त जा '' त्यानं उत्तर दिलं ! आपल्या स्वप्नाच्या शोधासाठी असे किमयागार जर भेटले तर प्रवास अधिक स्फूर्तीदायक होतो .
रात्री ११ . ०० च्या दरम्यान पुसेगावकडे जाणाऱ्या गाडीत बसलो . आयुष्यात पहिल्यांदाच 'पुसेगाव ' नावाच्या कधीच न ऐकलेल्या , पाहिलेल्या गावात मी स्वप्नाच्या शोधासाठी जात होतो .…माझ्या वेडेपणाचं मलाच अप्रूप वाटत होतं !
संपूर्ण प्रवासात झोप काही झाली नाही . गाडी सकाळी ४ . ०० वाजताच्या दरम्यान पुसेगावच्या चौकात थांबली . अज्ञात भूमीवर कोलंबसने पाय ठेवल्यागत मला वाटत होते . त्या चौकात वाहनांची वाट बघत बसलेली दोन माणसे मला दिसली . मुंबईत गाडीत चढण्यागोदर एका माणसाने मला अशी माहिती पुरविली होती कि सकाळी ४ वाजता तुम्ही पुसेगावात पोहचाल . त्यामुळे सेवागिरी मंदिरात थांबून पहाट झाल्यावर तुमच्या कामाला लागा ! तिथं आंघोळीची वगैरे सोय आहे . मी म्हटलं ठीक आहे . त्याप्रमाणे मी तिथं बसलेल्या त्या लोकांना विचारलं कि सेवागिरी महाराजांचे मंदिर कुठे आहे ? त्यांनी सांगितलं इथून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे . रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्यांचा अंदाज घेत मी चालत गेलो . आणि मंदिरात पाय टाकता क्षणीच मला दत्ताच्या फोटोची ' ती ' उंच फ्रेम दिसली ….
पुसेगावमध्ये सूर्य उगवल्यानंतर मला माझ्या दिशांच्या पुर्वग्रहाबद्दल आश्चर्य वाटले . मी दक्षिण समजत होतो ती पूर्व दिशा होती . कसं असतं आपण पूर्वीच्या काही ठिकाणं / चेहरे वगैरेंची तुलना नवीन ठिकाणं /चेहऱ्यांशी करत असतो . त्यामुळे पूर्वीचे निष्कर्षच पुढे येतात . असो ! पण पुसेगावात सर्वत्र स्वच्छता दिसत होती . मोठाली घरं होती पुसेगावात मोबाईलची किती दुकानं असतील याचा अंदाज घेत फिरत होतो . सकाळी ९ . ३० नंतर हळू हळू सर्व दुकाने उघडली . पण मला ' शाळेजवळ असलेले मोबाईलचे दुकान ' या स्वप्नसंदर्भाचा शोध घ्यायचा होता . म्हणून मी 'इंदिरा गांधी मुलींच्या शाळे'जवळ गेलो . कारण स्वप्नातील मुलगी दोन वेण्या वेण्या घातलेली होती . या शाळेतल्या मुलींचा पेहराव थोडासा तसाच होता . शाळेची दिशा आणि त्या गल्लीची दिशा अगदी स्वप्नात होती तशीच होती . त्यामुळे माझी उत्कंठा वाढली होती . मी थोडं पुढं गेल्यावर स्वप्नातल्या मोबाईल दुकानाच्या जागी ' शाम ' नावाचा बंगला दिसला . हां … पण त्या बंगल्याच्या समोर SAMSUNG अशी अक्षरे असलेले दोन बोर्ड पडलेले होते . एका घराच्या समोर ते बोर्ड ठेवलेले असल्यामुळे मी तिथं जाऊन काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता ! दुकानात जाउन विचारण्याचे प्रश्न घरात जाउन विचारू शकत नव्हतो . माझा खूपच विरस झाला . पण तिथं स्वप्नाच्या दिशेने विचार केल्यास सगळं अगदी तसंच होतं . नव्हती ती फक्त मला मोबाईल मिळवून देणारी ती मुलगी आणि माझा मोबाईल !
मी पुसेगावातल्या रस्त्यांवरून फिरत होतो . प्रत्येक मोबाईलच्या दुकानात जाऊन काही प्रश्न विचारत होतो . अंदाज घेत होतो ;पण काहीच हाती लागत नव्हते . एके ठिकाणी चौकशी करत असताना एका भल्या माणसाशी ओळख झाली . आनंद इंगवले . ह्या माणसाने मला त्याच्या दुकानात बसवून घेतले . माझी सर्व विचारपूस करून झाल्यावर माझ्यासाठी त्यांनी दुधाच्या कपची ऑर्डर मागवून घेतली आणि मला प्रेमाने ते पिण्याचा आग्रह केला . मी माझी ओळख नाईलाजाने पत्रकार अशी सांगितली . खरे कारण मी सांगितले नाही . नाहीतर त्यांना वाटले असते कि आपल्यावरच्या संशयारून हा माणूस आपल्या दुकानात आला आहे . ते मला म्हणाले कि , ' तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने मी ओळखले कि तुम्ही साधी व्यक्ती नाही आहात . ' खोटं बोलून एवढी एवढी स्तुती ऐकल्यावर मला अवघडल्यासारखे झाले . मी म्हटले , ' रात्रभराची जागरण आणि आंघोळ न केल्यामुळे वाटत असेल तसे ! पण तुमची बुद्धी खूप चांगली आहे त्यामुळे सुंदर दिसते सर्व तुम्हाला ! ' ते मस्त हसले . मला आंघोळ आणि नाश्ता करण्याचा खूप आग्रह त्यांनी केला ; पण मी नकार दिला . आपण आपल्या वेडेपणासाठी भटकतोय तर त्यांना त्रास नको द्यायला असे मला वाटत होते .
पुसेगावच्या रस्त्यावरून फिरत असताना एक कपडे जीर्ण झालेला माणूस एका मनोरुग्णाला पैसे देण्याचा प्रयत्न करत होता . मी जवळ गेलो . त्या माणसाने दारू पिलेली होती आणि तो बांधकाम कामगार वाटत होता . त्याच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळासारख्या अनेक माळा होत्या . मनोरुग्णाने पैसे घेण्यास नकार दिल्यावर त्याने त्याला वडापाव घेऊन दिला . मी एक वडापाव आणि आंब्याच्या रसाचा मोठा पाउच घेऊन दिला . माझ्याकडची पाण्याची बाटलीही मी त्याला दिली . मनोरुग्ण जेव्हा वडापाव खात होता तेव्हा मी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला . पण तो फक्त मान हलवत होता . दरम्यान ह्या बांधकामवाल्या दादांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती . त्याने सांगितले कि , तो कर्नाटकातल्या ' बैलहोंगल ' ( विजापूर ) इथून कामासाठी आला आहे . त्याला माझ्या वागण्याचे कौतुक वाटले होते ; पण उलट मलाच त्याच्या कृतीचे कौतुक वाटले होते . मी त्याला मनोरुग्नासाठी काम करतो वगैरे काहीच सांगितले नाही . विचारणा करत असताना त्याने मला माझा नंबर मागीतला . मी मनात म्हटले कि हा नंबर घेऊन काय करणार . त्याने पुढे विचारले कि ' तुमचे कांही विजिटिंग कार्ड आहे का ? ' मी नाही असे म्हटल्यावर तो म्हणाला कि ' मग contact कसे करणार ? ' मला त्याच्या इंग्रजी शब्द वापरण्याचे कौतुक वाटले . मी त्याच्याशी आणखी थोडासा संवाद केला . तो पुन्हा म्हणाला कि ' … देणारा वर आहे , तुम्ही ह्याला खायला दिलात , खूप बरं वाटलं , कुणी देत नाही असल्या लोकांना … ' तो असंच काही बोलत राहिला . मी मनोरुग्नाशी काही बोलतो का ते पुन्हा प्रयत्न करून पहिले . ह्याला इथून आपण नेऊ शकू का कधी असाही प्रश्न मनात आला . असो . पण मला त्या बांधकाम कामगार माणसाचं खूपच कौतुक वाटत होतं . कारण छान कपड्यातले किंवा पैसे असणारे लोक मनोरुग्ण किंवा तत्सम माणसांना टाळण्याचा आणि त्यांची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात . अगदी क्वचित कुणी त्यांना मानवतावादी भूमिकेतून मदत करताना दिसतो . परंतु ह्या कामगाराने त्याच्या मजुरीतल्या पैशाचा वापर ह्या 'मनोरागी' भावाला खायला देण्यासाठी वापरावा याचे मला खूपच कौतुक वाटले !
तिथून निघल्यानंतर मी आणखी काही दुकानांमधून मोबाईलच्या चौकशीचा प्रयत्न केला . काहीच हाती लागत नाही असे पाहून मी पुसेगावातून निघावे असा विचार केला . पुन्हा आनंद इंगवलेंना भेटलो . ते बसपर्यंत मला पोहोचवण्यासाठी आले . तिथे एक खूपच वृद्ध आजी भिक्षा मागत असलेली मला दिसली . माझ्याजवळ बिस्कीट आणि अंड्याची कोशिंबीर होती ती देत असताना मी आनंदना म्हटले , ' असे लोक दिसल्यावर खायला दिलं तर आपलं खूप नुकसान होत नाही , मनाला खूप शांती मिळते . ' मला त्यांचे मत हवे होते . ते म्हणाले , ' काय घेऊन जायचंय बरबर , आपण वाटत राहिलं पाहिजे जमेल तेव्हढ . ' मला "पुन्हा या कधीतरी " असे पुन्हा पुन्हा सांगत त्यांनी मी बसलेल्या बसलेल्या गाडीला हात पालवले !
या संपूर्ण प्रवासात मला काय मिळाले ………
मी गावाकडं खुपदा जंगलात एकटाच फिरत गेलो आहे . मुद्दाम वाट चुकलो आहे . नवनवीन वाटांवर नवनवीन अनुभव मिळतात . रानात मी मिसळून जातो … मुक्त होतो , खूप मस्त अनुभव येतात . कुठलीही दुपार , संध्याकाळ आवडली कि काही वाटांवर आपणहून पावले वळतात . मी आजही अशा वाटांवर जाऊन येतो . स्वप्नवत आणि अनोळखी प्रदेशात घुमण्याची माझी उबळ ' द अल्केमिस्ट ' वाचण्यापुर्वीची आहे ! फक्त इतक्या दुराचा प्रवास ह्या वेडेपनातून झाला नव्हता .
मोबाईल शोधाच्या प्रवासानं अतिशय कठीण काळात कसं निभावून न्यायचं याची तालीम झाली . जगात इतक्या सुंदर गोष्टी आहेत कि , आपण आपल्या विवंचना आणि ' मी ' च्या पल्याड न गेल्यामुळे त्या गमावून बसतो . सुंदर आहे जग आणि आयुष्यही ! आपल्या स्वप्नांसाठी जगण्याची इच्छा असेल तर हीच वेळ अगदी योग्य आहे ! यापेक्षा वेगळी संधी नाही . आपली उर्जा / चैतन्य कुठे आणि कसं फुलेल याचे ठरीव साचे आपण मोडले पाहिजेत . ज्या ठिकाणी मोकळं आणि मुक्त वाटेल त्या ठिकाणी मुक्त होता आलं पाहिजेत . मग ते रानात हिंडणं , शेतात राबणं ,मोर्चा - आंदोलनात बेंबीच्या देठापासून जय-घोषणा देणं , लिहिणं , वाचण , बोलणं , बघणं , ऐकणं इत्यादी . आपल्या सर्जनाची कक्षा आपण विस्तृत समृद्ध केली पाहिजेत . न जाणो एखाद्या अनोळखी क्षणी आपल्याला अनोळखी पण ओळखीचं वाटणारं कुणी भेटेल . कुठल्याशा अनोळखी वाटा ओळखीच्या नात्याने तुमची वाट पहात असतील ! एखाद्या गोष्टीत संधी घेताना बिचकणं आणि थांबण्यातून आपल्या नव्या अनुभवाची शिदोरी तुटेल … ! एकच तर आयुष्य आहे ; जे करू ते झोकून देऊन … कुणालाही दुख: न देता … पराकोटीचा स्वार्थ न जोपासता … सर्जनशील आणि उन्मुक्त ! तयारी करून अपेक्षित सर्व काही मिळेलही ; पण ' अनपेक्षित ' गावात जाणं होणारच नाही ! आपलं काही हरवत नसतं ; आपण फक्त मालकी गाजवत बसतो . हे आत्ताचे क्षण मात्र आपले आहेत ; होऊ दे नवीन निर्माण !
( लेख typing करून होईपर्यंत आज ( 16/03/2016 ) मिळालेली बातमी अशी आहे कि माझा फोन स्ट्रेस झाला आहे . पुण्याच्या सायबर एस . पीं . च्या आदेशाची वाट बघत साताऱ्याचे पोलिस बसले आहेत . बघू काय होतंय ! )
…. समाप्त ( कि सुरुवात !)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा